narendra modi

स्वातंत्र्यदिनी मोदींचा मेक फॉर वर्ल्ड चा नारा!

देश विदेश न्यूज ऑफ द डे

दिल्ली: आज भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी भारताला काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाने सगळयांना रोखलं आहे. कोरोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल, मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचंच नाही तर जगातील अनेक देशांचं पोट भरु शकतो. देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे. आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’ सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे.

भारतात कोरोनाचे संकट असताना सुद्धा, भारत एफ डी आय गुंतवणुकीत सगळ्यात पुढे आहे. भारतात सगळ्यात जास्त गुंतवणूक झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कोरोना वॉरियर्स विषयी त्यांच्या भाषणात विशेष भावनिकता दिसून आली आणि ‘मेक फॉर वर्ल्ड’ मधून भारताची पुढील रणनीती सुद्धा दिसून आली. अमेरिकेसह अन्य देशांना भारताने २३ लाख पी पी इ किट्स निर्यात करून दिल्या हे सांगताना देखील त्यांचा रोख आपण या संकल्पाकडे एक पाऊल टाकले आहे असाच होता.

Tagged