dalimb sheti

गेवराई

कोरोनाचा डाळींब शेतीला फटका; उत्पन्न निम्म्यावर! मात्र तरीही शेतकरी पाय रोवून उभा

By Karyarambh Team

August 16, 2020

धोंडराई येथील बाळासाहेब शिंदे यांच्या फळबागेची आदर्श कहाणी

मंगेश चोरमले / गेवराई 9404229703

कोरोनाचा फटका सार्‍याच क्षेत्राला बसला तसा तो शेतीलाही बसला आहे. त्यातल्या त्यात लाखो रुपये खर्च करून ज्यांनी यावर्षी पहिल्यांदाच फळबागा उभ्या केल्या त्यांना तर फार मोठी झळ बसली आहे. पण अशाही परिस्थितीत शेतकरी पाय रोवून उभा आहे. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील बाळासाहेब शिंदे हे असेच एक तरूण शेतकरी. संकटापुढे हार न मानता त्यांनी आपल्या फळांना मध्यप्रदेशची बाजारपेठ खुली करून दिली. तेथे विकलेल्या 1400 ते 1500 कॅरेटच्या डाळींबातून त्यांना आतापर्यत साडेसात लाख रुपये मिळाले आहेत. अडीच एकरमध्येच त्यांनी हे डाळींब केले होते.

बाळासाहे शिंदे यांच्या डाळींबाचे झाड असे फळांनी लगडलेले आहे.

बाळासाहेब शिंदे या तरुण शेतकर्‍याने पारंपरिक पिकांना फाटा देत फळांची आदर्श शेती करण्याचा मानस घेतला केला. बाळासाहेब यांनी आपल्या 14 एकर शेतात संपूर्ण फळबाग केली आहे. डाळींब अडीच अकर, पपई तीन एकर, कलिंगड दिड एकर, आणि आलटून पालटून इतर काही तीन महिन्यांत येणारी फळवर्गीय पिकं घेतात. पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या शेतात 40 लाख लिटर क्षमतेचा शेततलाव तयार केला आहे. सर्व 2013 साली त्यांनी अडीच एकर क्षेत्रामध्ये भगवा जातीचे बारा बाय दहा या अंतराने एकुण नऊशे पन्नास झाडांची डाळींब बाग लावलेली आहे. दरवर्षी त्यांच्या डाळींबाला 800 ते 900 व जास्तीत जास्त हजार रुपये प्रति कॅरेट दर मिळायचा. या बागेतून त्यांना 12 ते 14 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. परंतु यंदा कोरोनामुळे डाळींब शेतीला मोठा फटका बसला आहे. उत्पन्न निम्म्यावर आले आहे.

मध्यप्रदेशातील बुलंद शहरात या डाळींबाला मार्केट उपलब्ध झाले

बाळासाहेब शिंदे हे एक तरुण व प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या शेतीला आपल्या विकासात्मक दृष्टीतून आधुनिक तंत्राज्ञानाची जोड देत स्वतःच्या प्रगतीचे मार्ग शोधले. इतरही शेतकर्‍यांना फळबाग करण्यासाठी ते प्रोत्साहित करीत असतात. फळबागाची शेती कधीच तुम्हाला दगा देणार नाही, असे ते आपल्या अनुभवावरून सांगतात. त्यासाठी शेतीशी मैत्री करावी लागते. अशी मैत्री एक दोन दिवसात होत नाही तर दर दिवस शेतीत कष्ट उपसल्यानंतर होते. शेतीत काय कमी काय जास्त हे तिच्या दररोजच्या सहवासातून आपल्याला समजते, असेही बाळासाहेब शिंदे म्हणाले.

कोरोनामुळे फळबागेला फटका बसला असला तरी शेती तुम्हाला एक ना एक दिवस साथ देईल. त्यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन त्यांचे अनुभव आपण समजून घ्यावे लागतात. शेतीत वेगवेगळे प्रयोग सातत्याने करीत रहावे लागते. आमच्याकडे एक राज्यस्तरीय व्हॉटसअ‍ॅप ग्रुप आहे. ग्रुपमधील सदस्य आपआपले अनुभव त्यात शेअर करीत असतात. आज 14 एकरच्या फळबागेतून आम्ही दोघे भाऊ 25 लाखाचे उत्पन्न घेतो. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी फळबागेकडे वळावे. ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची सोय कशी होईल ते पहावे.बाळासाहेब शिंदे , शेतकरी, धोंडराई संपर्क- 9730671564