बीड: बीड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व शासकीय यंत्रणेवर पडलेला ताण पाहता रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत म्हणून जिल्हाधिकारी, बीड यांनी आपल्या विशेष अधिकारात बीड शहरातील लोटस हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल व पॅराडाईज हॉस्पिटल अधिग्रहित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. वरील तीनही खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारापोटी जी देयके (बिल) रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अदा करण्यात येतील ती देयके (बिल) दिनांक 21 मे 2020 रोजीच्या महाराष्ट्र शासनाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या दर पत्रकाप्रमाणे देण्यात यावेत, सदरील दरपत्रक हे संपूर्ण राज्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणार्या खाजगी रुग्णालयांना लागू आहे. त्यामुळे बीड शहरातील जे नागरिक औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत असतील त्यांनीही दर पत्रकाप्रमाणेच बिल अदा करावे असे आवाहन नगर पालिकेचे गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केले आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारा पोटी राज्यातील खाजगी रुग्णालयांनी अवाच्या सव्वा फी आकारणी करू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने 21 मे 2020 रोजी अधिसूचनेद्वारे पुढील प्रमाणे दर पत्रक निश्चित केले आहे. जनरल वॉर्ड विलगीकरणा साठी प्रति दिवस 4000 रुपये, आयसीयू विलगीकरणा साठी (व्हेंटिलेटर शिवाय) प्रति दिवस 7500 रुपये व आयसीयू व्हेंटिलेटर सहित विलगीकरणा साठी प्रति दिवस 9000 रुपये या तिनही प्रकारात रुग्णांना काही मोफत चाचण्या व सेवा पुरवण्यात येणार आहेत. यासंबंधीचे बॅनर्स कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणार्या खाजगी रुग्णालयाबाहेर लावण्याची विनंती जिल्हा शल्यचिकित्सक, बीड यांना केल्यानंतर त्यांनी तात्काळ यास सहमती दर्शवत खासगी रुग्णालयांना तशा सूचना करण्याचे आश्वासन दिले. यासोबत कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांकडून व रुग्णवाहिकां कडून वाजवी शुल्क आकारणी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी, बीड यांनी भरारी पथकाची देखील स्थापना केलेली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारापोटी खाजगी रुग्णालयांनी जास्तीची दर आकारणी केल्यास आमच्याशी संपर्क साधावा, आ. संदीप क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जनतेच्या सेवेसाठी आम्ही 24 तास उपलब्ध असल्याचे नगरपालिकेचे गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
एका दिवसाच्या घेतल्या गेलेल्या दरामध्येखालील गोष्टींचा समावेश आहे.
1) रुग्णांची नियमित देखभाल, 2) रक्त व लघवी तपासणी, 3) इतर तपासण्या जसे की सोनोग्राफी, 2-डी इको, एक्स-रे, ईसीजी. 4) मर्यादित किरकोळ औषधे 5) डॉक्टर्स तपासणी 6) रुग्ण बेड चार्जेस 7) नर्सिंग चार्जेस 8) जेवण 9) छोटे उपचार जसे की नाकातून नळी टाकणे, लघवीसाठी नळी टाकणे. यासोबतच खाजगी रुग्णालयांना पीपीई किटचा पुरवठा जिल्हा रुग्णालयातून होणार आहे.