बीड : जिल्ह्यात कोरोनाची इतकी भिती घालून ठेवलीये की त्यापुढे इतर मृत्यूंना नगण्य केले आहे. गेल्या तीन महिन्यात जेवढे मृत्यू कोरोनाने झाले त्याच्याहून अधिक मृत्यू हे ‘सारी’ या आजाराने झाले आहेत. मात्र प्रशासन दफ्तरी या मृत्युची कुठेही नोंद नाही. इथे जिल्ह्यातच असा प्रकार होतोय असे नाही. तर देशपातळीपासून हेच सुरु आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी या विरोधात आवाज उठवून कोरोनाबरोबरच ‘सारी’ आजाराच्या रुग्णांची देखील वेगळी नोंद घ्यायला सरकारला भाग पाडावे.
आतापर्यंत प्रशासनाने जिल्ह्यात 60 हजारच्या आसपास आरटीपीसीआर आणि अॅन्टीजेन टेस्ट केल्या आहेत. त्यात 4202 कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यातील 110 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. जे कोरोना पॉझिटिव्ह निघाले त्यातील 70 टक्के रुग्णांना कसलीही लक्षणं नाहीत. तर ज्यांना सर्दी, खोकला, कफ, धाप किंवा श्वसनासंबंधी काही लक्षणं होती. पण त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला, अशा रुग्णांना सीटीस्कॅनमध्ये न्युमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सीटीस्कॅनमध्ये अशा रुग्णांमध्ये काही स्पॉट दाखवले जातात. अशा रुग्णांची आम्ही अधिकृतपणे न्युमोनिया तर खासगीत सारी आजाराचे रुग्ण म्हणून नोंद ठेवतो. शिवाय ही माहिती दररोज स्थानिकच्या आरोग्य प्रशासनाला कळविली जाते. जी ट्रीटमेंट कोरोना रुग्णांना तीच ट्रीटमेंट ‘सारी’ आजारातील रुग्णांवर आम्ही करतो. कोरोना झालेल्या रुग्णांना सध्या रेमडेसिव्हर हे इंजेक्शन दिले जाते. ‘सारी’ आजारातही हेच इंजेक्शन आम्ही वापरत आहोत, असेही एका जबाबदार वैद्यकीय व्यवसायिकाने ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले.
आरोग्य विभागाकडून सध्या केवळ स्वॅब घेणे आणि पॉझिटिव्ह रुग्ण बाजुला काढणे, एवढंच काम सुरु आहे. परंतु लक्षणं दिसत असूनही पण कोरोना निगेटिव्ह आलेल्यांना वेगळं काढलं जात नाही. अशी रुग्ण न्युमोनिया म्हणून ट्रीट केली जातात. परंतु हेच रुग्ण ‘सारी’ आजाराचे आहेत. त्यामुळे अशा रुग्णांचीही काही वेगळी व्यवस्था, नोंदणी करणे गरजेचे आहे, असेही एका वैद्यकीय व्यवसायिकाने सांगितले.
कोरोनापेक्षा जास्त मृत्यू ‘सारी’चे
कोरोनात आतापर्यंत बीड जिल्ह्यात 110 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु तितकेच किंवा त्याहून अधिक मृत्यू ‘सारी’ आजाराने झाले आहेत, असा दावाही या वैद्यकीय व्यवसायिकाने केला आहे. परंतु आपलं आरोग्य प्रशासन फक्त कोरोनाचे रुग्ण मोजत आहे. एखादा रुग्ण कोरोना निगेटिव्ह आला असेल आणि त्याचा दोन ते तीन दिवसात मृत्यू झाला असेल अशा रुग्णांचं पीएम करून किंवा त्याच्या आरटीपीसीआर किंवा अॅन्टीजेन टेस्ट करून ‘सारी’चे रुग्ण बाजुला काढण्याची आता गरज आहे.
वैद्यकीय अधिकार्यांकडून दुजोरा
‘सारी’ हा आजार देखील संसर्गजन्य आहे. जी काळजी कोरोनाच्या बाबतीत घेतली जाते तीच काळजी सारी आजाराच्या बाबतीत घेणेही गरजेचे आहे, असेही काही वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात सारी आजाराचे रुग्ण वाढत आहेत ही वस्तुस्थिती असल्याची कबुली एक दोन नव्हे तर बहुतांश वैद्यकीय अधिकार्यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.
खंडपीठात जाऊन न्याय मागण्याची गरज
सारी आजाराबद्दल खरी वस्तुस्थिती काय याबद्दल राज्याचा आरोग्य काहीतरी लपवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात हायकोर्टात जाऊन महाराष्ट्रात, मराठवाड्यात सारी आजार आहे की नाही? याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाकडून अधिकृत माहिती मिळवणं गरजेचं आहे.
12 सीटीस्कॅन सेंटर, दररोज 10 ते 12 रुग्ण
बीड जिल्ह्यात सरकारी 2, खासगीमध्ये परळीत 2, अंबाजोगाई 1, बीडमध्ये 6 आणि माजलगावात 1 असे 12 सीटीस्कॅन सेंटर आहेत. ‘सारी’ आजाराचे रुग्ण टेस्ट करून शोधण्याची सध्या सोय नाही. त्यामुळे सीटीस्कॅन करणे हाच एकमेव पर्याय रुग्णांसमोर आहे. सीटीस्कॅनमध्ये स्पॉट आढळून आले, न्युमोनिया निष्पन्न झाला पण कोरोना निगेटिव्ह आला असा रुग्ण हा ‘सारी’ आजारात मोडला जातो. दररोज जिल्ह्यात 10 ते 12 रुग्ण हे ‘सारी’ आजाराचे आढळून येत आहेत. मात्र आरोग्य प्रशासनाचे त्याकडे अजिबात लक्ष नाही.