jayakwadi dharan- nathsagar

न्यूज ऑफ द डे

जायकवाडीचं पाणी कुठल्याही क्षणी गोदापात्रात सोडणार

By Karyarambh Team

September 02, 2020

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरु

पैठण, दि.2 : पैठणचे नाथसागर जलाशय 95 टक्के भरले असून आता कुठल्याही क्षणी गोदावरीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेऊन गोदाकाठी असलेल्या नागरिकांना पैठण तहसीलदारांमार्फत सावधानतेचा इशारा दिला आहे.पैठण येथील नाथसागर धरणाच्या जलसाठ्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने बुधवार रोजी या धरणाची पाणी पातळी जवळपास 95 टक्के नोंद झाली आहे. त्यामुळे वरील धरणातून येणारी पाण्याची आवक पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने नाथसागर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आहे. या बैठकीमध्ये अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रभारी अधीक्षक राजेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत ठरल्यानुसार गोदापात्रात केव्हाही पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यामार्फत सावधानतेचा इशारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरीही बुधवारी रात्री उशिरापर्यंत धरणामध्ये 8787 क्युसेक अशी आवक सुरु होती. त्यामुळे प्रशासन तितक्याच प्रमाणात विसर्ग करण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या बैठकीचा हा इतिवृत्तांत

पैठण जलाशयाची पाणीपातळी दर्शवणारी पट्टी…