india first vaccine bharat biotech

कोरोना अपडेट

भारतात कोरोना लस कुठपर्यंत आली? क्लिक करून जाणून घ्या

By Karyarambh Team

September 09, 2020

नवी दिल्ली, दि.9 : रशियाने कोरोनावरील लस शोधून ती याच आठवड्यात देशात वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून भारतात कोरेाना लस नेमकी कधी येणार, भारतीय कंपल्या तयार करीत असलेल्या कोरोना लशीची सद्यस्थिती काय आहे? याबाबत भारतीयांना प्रचंड उत्सुकता लागलेली आहे.

आपल्या देशात भारत बायोटेक, झायडस कॅडिला आणि सिरम इन्स्टिट्यूट भागीदार असलेली ऑक्सफर्डची अ‍ॅस्ट्राझेनेका ही लस भारताला मिळणार आहेत.

1)आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झालेली आहे. मंगळवारपासून या लशीच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही स्वदेशी लस आहे.

2) झायडस कॅडिलाच्या लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी देखील संपलेली आहे. आता या लशीची दुसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही लस देखील स्वदेशी आहे.

3) देशात तिसरी चाचणी ही सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीची सुरू आहे. ही ऑक्सफर्डची प्रसिद्ध लस आहे. अ‍ॅस्टाझेनेका या कंपनीची ही लस आहे. मात्र या कंपनीची ही लस सीरम इन्स्टीट्यूट देखील तयार करत आहे. सीरम इन्स्टीट्यूटची लस तयार करण्याची क्षमता जगातील इतर कंपन्यापेक्षा चांगली आहे. सीरम इन्स्टीट्यूटमध्ये एका महिन्यात 7.5 कोटी ते 10 कोटी डोस बनवण्याची क्षमता आहे. ब्रिटन, अमेरिका आणि ब्राझीलमध्ये या लशीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. भारतात देखील या लशीची चाचणी सुरू होणार आहे. पुढील आठवड्यात दिल्ली, चेन्नई, पुणे अशा 17 ठिकाणी या लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी होत आहे. ही चाचणी भारतीय स्वयंसेवकांवर होईल. भारतात सुमारे 1,600 स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी होईल. इतर देशांमध्ये स्वयंसेवकांची संख्या भारताच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. अमेरिकेत 30 हजार स्वयंसेवक, तर ब्राझीलमध्ये 5 हजार स्वयंसेवकांवर लशीची चाचणी होत आहे. सिरममध्ये तयार झालेल्या लशीपैकी 50 टक्के लस भारताला मिळणार आहेत.

लस संदर्भात अधिकृत स्पष्टीकरणनीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी लशीच्या स्थितीबाबत भाष्य केले आहे. सध्या देशात तीन कंपन्या लस तयार करत असून या सर्व लशी क्लिनिकल ट्रायलमध्ये असल्याची माहिती डॉ.पॉल यांनी दिली आहे.

रशियाच्या लशीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी भारतात होणारया व्यतिरिक्त रशिया आपल्या स्पुटनिक व्ही या लशीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी भारतासह अन्य देशांमध्ये करणार असल्याचे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लशींसंदर्भातील वरील सद्यस्थितीवर नजर टाकली असता असे दिसते की कोरोनाचे भारतात लसीकरण 2021 साल उजाडण्यापुर्वी किंवा उजाडल्यानंतरच शक्य होणार आहे. तोपर्यंत सर्वांना कोरोनासोबत जगावं लागेल.