aurangabad-high-court

सीईओ हजर करून घेत नसलेल्या शिक्षकांची खंडपीठात धाव

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना बीडमध्ये रुजू करून न घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला असताना त्यांची ही भूमिका शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध असून राज्यशासनाने बिंदूला बिंदू बदली केली असताना अतिरिक्त शिक्षकांचा आणि विद्यमान बदल्यांचा कसलाही संबंध नसल्याचे राज्य शासनाने कळून देखील शिक्षकांना हजर करून घेतले नाही. या विरुद्ध बीड जिल्हा परिषदेत बदलून आलेल्या तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असून खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायमूर्ती गंगापूरवाला यांनी बीड जिल्हा परिषदेमध्ये हा नेहमीचाच प्रकार असून हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा असे मत व्यक्त करत बीड जिल्हा परिषदेला नोटीस बजावली आहे.

   तीन शिक्षकांनी आपल्या बिंदूवर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना समायोजित केले जावू नये, असं देखील याचिकेत म्हंटले असून यावर तात्काळ जिल्हा परिषद बीड ने न्यायालयात म्हणने सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. आंतरजिल्हा पद्धतीने बीड जिल्ह्यांमधून 51 शिक्षकांची इतर जिल्ह्यात बदली झाली आहे. राज्यातील विविध जिल्हा परिषद मधून 41 शिक्षकांची बदली बीड जिल्हा परिषदेमध्ये झालेली आहे. आंतरजिल्हा बदली मध्ये मागील काळात मोठा भ्रष्टाचार झालेला असताना बिंदू ला बिंदू बदलून आलेल्या शिक्षकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बीड जिल्हा परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र सदर बदल्या बिंदूच्या बदल्यांमध्ये बिंदू झाल्यामुळे सदरील जिल्हा परिषदांना बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे क्रमप्राप्त आहे. कारण त्यांच्या जागेवर इतर जिल्ह्यातून दुसरा शिक्षक येणार आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातून बदलून गेलेल्या 51 शिक्षकांच्या रिक्त झालेल्या बिंदूवर बीड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याचा मानस जिल्हापरिषद बीडचा असून मात्र बदलून आलेल्या 41 शिक्षकांच्या बाबत जिल्हा परिषद बीड ची भूमिका स्पष्ट दिसत नाही. बदलून आलेले 41 शिक्षकांना अतिरिक्त म्हणून राहावे लागते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याविरुद्ध तीन शिक्षकांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड.स्नेहल जाधव व विशाल कदम यांच्यामार्फत धाव घेतली आहे. सदर प्रकरणात स्नेहल जाधव यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने या तीन शिक्षकांच्या बाबत जिल्हा परिषदेला नोटीस पाठविली आहे.

न्यायालयात न गेलेल्या शिक्षकांचे काय?
जे शिक्षक न्यायालयात गेले आहेत, त्यांना आज नियमाप्रमाणे जिल्हापरिषद मध्ये रुजू होण्यास उपस्थित राहण्याचे सांगितले असून त्यांच्याबाबत खंडपीठाने जिल्हा परिषदेला नोटीस काढली असून इतर 38 शिक्षकांच्या बाबत न्यायालयाने काहीच उल्लेख केला नाही. त्यामुळे इतर 38 शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केले असेल तर त्यांचे भवितव्य हे जिल्हा परिषदवर अवलंबून आहे.

Tagged