google class room

न्यूज ऑफ द डे

गुगल मार्फत जिल्हा परिषद शिक्षकांना प्रशिक्षण सुरू

By Karyarambh Team

September 13, 2020

बीड, दि.13 : जिल्हा परिषद बीड अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना गुगल मार्फत प्रशिक्षण देण्यात येत असून जिल्ह्यातील अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांना हे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले आहे.याद्वारे जिल्हा परिषद शिक्षक गुगल क्लास रूम या अत्याधुनिक शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी शिक्षण विभागाने याअगोदर माझी शाळा अ‍ॅप, ऑनलाईन योगा, स्कूल फ्रॉम होम, फेसबुक लाईव्ह अशा उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. आता या गुगल प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट झाल्यानंतर या शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावण्यास मदत होणार आहे.कोविड 19 मुळे ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण करताच प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळते. आता फक्त ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या अपुर्‍या आणि धिम्या नेटवर्कच्या समस्येवर मात करून शिक्षक हे कसे साध्य करणार हे पाहणे रंजक ठरेल. शिवाय यासाठी लागणारे स्मार्ट फोन आणि संगणकही बहुतांश ग्रामीण विद्यार्थ्यांना उपलब्ध कसे होणार हा देखील प्रश्नच आहे!