LAL PARI ST

कोरोना अपडेट

आता लालपरी 100 टक्के आसन क्षमतेने धावणार

By Shubham Khade

September 17, 2020

बीड : कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका सहन करावा लागलेल्या रा.प.म. विभागाने आज (दि.17) मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात बसमधून आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे लालपरी आता पूर्णतः पूर्ववत होऊन फुल्ल भरुन धावणार आहे.

कोरोना संकटाचा अनेक सर्वच क्षेत्रांना फटका सहन करावा लागला. परंतू, रा.प.म. या विभागाला इतर विभागांच्या तुलनेत मोठी हानी सहन करावी लागली. लालपरीची चाके लॉकडाऊन झाल्यापासून बंद झाली होती. त्यामुळे विभागातील कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊन अनेकांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला होता. अनलॉक प्रक्रियेदरम्यान गत महिन्यात राज्य शासनाने लालपरीला रस्त्यावर पुन्हा एकदा धावण्याची संधी दिली. त्यानंतर आता रा.प.म. विभागाने बसेसला पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लालपरी ‘फुल्ल’ भरलेली दिसणार आहे. कर्नाटक व गुजरात राज्यात 100 टक्के आसन क्षमतेने वाहतूक होणार असल्याने महाराष्ट्रात देखील हा निर्णय घेण्यात आल्याचे रा.प.म.च्या महाव्यवस्थापकांनी पत्रात म्हटले आहे. बीड जिल्ह्यात उद्यापासून (दि.18) नव्या निर्देशाची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, प्रवाशांनी मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, बसेस निर्जंतुकीरण करुनच मार्गस्थ कराव्यात, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.