चक्क पोलीस ठाण्यातच तक्रारदारावर तलवारीने हल्ला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव शहरातील घटना, पोलीस कर्मचारीही जखमी

 माजलगाव  दि.22 : पोलीसांचा गुंडांवर धाक आहे की नाही असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. चक्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास आलेल्या तक्रारदारावर ठाण्यातच तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. या घटनेने माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
     संतोष ज्ञानबा गायकवाड, सोनाजी उत्तम गायकवाड व आकाश बबन जाधव यांनी सातआठ लोकांना सोबत घेऊन योगेश ज्ञानदेव गायकवाड या युवकाला हॉटेलवर जेवणाचे दोन हजार रुपये तु का मागितले म्हणून चिंचगव्हाण येथील त्याच्या घरी मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.21) रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संतोष उत्तम गायकवाड यांच्या चिंचगव्हाण येथील राहत्या घरी योगेश गायकवाड याने येऊन संतोष गायकवाड यास शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या संतोष गायकवाड यास चक्क पोलीस ठाण्यातच योगेश गायकवाडने आपला मित्र वैभव व्यवहारे कडून तलवार घेत डोक्यावर हल्ला केला. यावेळी योगेश यांनीही आपल्या त्यातील चाकू काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्यस्थी करणारे एक पोलिस कर्मचारीही जखमी झाले असून ठाणे अंमलदारांच्या केबिनची नासधुस झाली आहे. दरम्यान पोलिसांनी योगेश ज्ञानदेव गायकवाड यांच्या वरून संतोष गायकवाड सोनाजी उत्तम गायकवाड व आकाश बबन जाधव व इतर पाच ते सहा यांच्याविरुद्ध आर्मएक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर संतोष उत्तम गायकवाड याच्या फिर्यादीवरून योगेश गायकवाड,वैभव व्यवहारे यांचे विरुद्ध भा द वि 307 (34) आर्म एक्ट 353 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून दोन हल्लेखोर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. जखमी युवकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.नीता गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करत आहेत.

Tagged