ऊसतोड मजुरांशी गुंडगिरी करणार्‍या प्रा.शिवराज बांगर यांचे आंबेडकरांकडून ‘प्रमोशन’

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

ऊसतोड कामगार संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी
बीड : यंदा ऊसतोड कामगारांच्या संपात उडी घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम संघटना सोमवारी जाहीर केली. धारूरच्या घाटात चार दिवसांपूर्वी ऊसतोड मजूरांना मारहाण करून गाड्या फोडत गुंडगिरी करणार्‍या वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘प्रमोशन’ करत त्यांच्यावर ऊसतोड कामगार आघाडीच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.

प्रा.शिवराज बांगर यांनी गत विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेतून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्या पदावर सहा महिने काम केल्यानंतर गत महिन्यापासून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर प्रा.शिवराज बांगर हे सक्रीय झाले आहेत. त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेण्यावर जोर दिला असून साखर आयुक्तांची भेट घेऊन प्रश्न मांडले आहेत. दरम्यान, त्यांनी धारूरच्या घाटात चार दिवसांपूर्वी ऊसतोड मजूरांना मारहाण करून गाड्या फोडल्या होत्या. ही आघाडीची गुंडगिरी असल्याची टिका समाजमाध्यमातून झाली. त्यानंतरही बीडचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘प्रमोशन’ करत त्यांच्यावर ऊसतोड कामगार आघाडीच्या थेट राज्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. तर उपाध्यक्षपदी देखील बीड जिल्ह्यातील नामदेव सानप, रमेश राठोड, शेख उस्मान या तिघांच्या नियुक्त्या केल्या आहेत. बीड जिल्हाध्यक्षपदी रानबा उजगरे, बीड तालुकाध्यक्षपदी धनंजय रोकडे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान कार्यकारिणीत बांगर यांच्यासह बीडच्या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर स्वतंत्र आघाडी स्थापन करून आंदोलनात महत्वाची भुमिका बजावणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Tagged