CHAKU-HALLA

क्राईम

पॅरोलवर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला!

By Keshav Kadam

October 07, 2020

वडीलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला चाकू हल्ला

बीड :  पॅरोलवर तरुंगातून बाहेर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या कैद्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे घडली. या प्रकरणी गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.       पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान शिवाजी पांढरे (रा. धोंडराई, ता. गेवराई) असे कैद्याचे नाव आहे. भावकीतीलच प्रल्हाद पांढरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात तो पैठण कारागृहात शिक्षा भोगत होता. कोव्हिड-19 मुळे अनेक कैद्यांना जामीन दिलेला आहे. यातच भगवानही बाहेर आला होता. तर वडीलांचा खून केल्याचा राग मुलगा महादेव प्रल्हाद पांढरे याच्या मनामध्ये होता. भगवान राहत असलेल्या धोंडराई येथील घरी जावून त्यास ‘माझ्या वडिलांचा खून करून सुद्धा तू गावात मोकळा फिरत आहेत, आता तुलाही जीवे मारतो असे म्हणत त्याने खिशातील चाकू बाहेर काढला भगवानच्या पोटात खुपसला तसेच हातावरही वार केले व पसार झाला. या घटनेमुळे गावात एकच गोंधळ उडाला. भगवानचा मुलगा सचिन व तर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुन्हा त्यास बीडच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असे सचिन पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर फिर्यादीवरून महादेव प्रल्हाद पांढरे याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटकही करण्यात आली असल्याची माहिती पोनि.पुरुषोत्तम चोबे यांनी केली.