क्राईम

कन्हैय्या हॉटेलसमोर उभ्या ट्रॅव्हल्समधून आठ लाख चोरी

By Keshav Kadam

October 09, 2020

चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलीसात गुन्हा दाखल

नेकनूर  :  बॅगमध्ये आठ लाख रुपये घेवून व्यापारी खरेदीसाठी जात होता. ट्रॅव्हल्स हॉटेल कन्हैय्या समोर थांबली. लघुशंकेसाठी व्यापारी खाली उतरला परत पाहिले तर बॅग उघडी दिसली. त्यामधील आठ लाख रुपये लंपास करण्यात आले. सदरील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         ए आलम वकील खॉ पठाण (वय 33 रा.बौद्धनगर ता.जि.लातूर) असे व्यापार्‍याचे नाव आहे. त्यांनी नेकनूर पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 8 ऑक्टोबर रोजी लातूर येथे कलेक्शन नावाने कपड्याचे दुकान आहे. लातूर येथील विश्वा ट्रॅव्हल्सने (एमएच-24 एयु-3939) खरेदीसाठी सोबत बॅगमध्ये आठ लाख रोख घेवून निघाले. ट्रॅव्हल्स वाटेत कुठेच थांबली नाही. पुढे नाश्ता करण्यासाठी सायंकाळी 5.40 च्या सुमारास बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील कन्हैय्या हॉटेलवर थांबली. यावेळी बॅग सीटच्या बाजुला ठेवून लघवीसाठी खाली उतरलो परत सीटवर जाऊन बसल्यानंतर पाहिले की, बॅग उघडी होती. त्यामधील पैसे गायब होते. ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्ही तपासले असता दोन अज्ञात चोरट्यांनी बँगमधील पैसे घेऊन जाताना आढळून आले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.