क्राईम

चंदनतस्कर माजी नगरसेवक बालाजी जाधवसह चौघांवर गुन्हा

By Keshav Kadam

October 09, 2020

एक आरोपी अटक तिघे फरार

 अंबाजोगाई, दि.9 :  अंबाजोगाई-अहमदपूर रोडवर पिंपळा धायगुडा शिवारात सापळा रचून चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार्‍या 64 हजारांच्या चंदनासह एकूण 5 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी (दि.9) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत एका चंदनचोरास अटक करण्यात आली. या प्रकरणी केजच्या माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.        अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर चोरीचे चंदन घेऊन एक पांढर्‍या रंगाची बोलेरो गाडी अंबाजोगाईच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी सनिल जायभाये यांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच जायभाये यांच्या आदेशाने त्यांच्या विशेष पथकाने पिंपळा धायगुडा येथे सापळा लावला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास टीप मिळालेली बोलेरो गाडी (एमएच 31 डीव्ही 8331) अंबाजोगाईकडे येताना दिसताच पोलिसांनी तिला अडविले. गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीटवर पांढर्‍या पोत्यात ठेवलेले 64 हजार रुपये किमतीचे 32 किलो सुगंधित चंदन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी चंदन आणि बोलेरो असा एकूण 5 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालक तुषार प्रभाकर आंबाड (रा. इरिगेशन ऑफिसच्या पाठीमागे, केज) याला बेड्या ठोकल्या. केजचा माजी नगरसेवक बालाजी जाधव याच्या सांगण्यावरून आपण हे चंदन घाटनांदूर येथील अनोळखी व्यक्तीकडून घेतले आहे. ते बालाजी जाधव याच्या स्वाधीन करण्यासाठी केजला वापस जात होतो असे आंबाड यांनी पोलीस चौकशीत सांगितले. याप्रकरणी पो.ह. लक्ष्मण टोले यांच्या फिर्यादीवरून तुषार आंबाड, बालाजी जाधव, बोलेरो मालक समीर हनुमंत साळुंके या चौघांवर कलम 379, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम कलम 41,42 आणि भारतीय वृक्षतोड अधिनियम कलम 26(फ) अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी लक्ष्मण टोले, माने, गुंड, मुंडे कांगणे, आतकरे यांनी केली.