क्राईम

महामार्ग पोलीसांनी सिनेस्टाईलने कार पकडून अपहृत तरुणाची सुटका केली

By Keshav Kadam

October 15, 2020

माजलगावातून केले होते तरुणाचे अपहरण

 बीड :  माजलगाव शहरातून एका तरुणास पकडून गाडीत बसवले. अन् गाडी सुसाट वेगाने शहराबाहेर निघाली. काहीतरी गंभीर प्रकार असल्याचे समजल्यानंतर महामार्ग पोलीसांना याची माहिती दिली. महामार्ग पोलीसांनी या गाडीवर लक्ष ठेवले. काही वेळातच त्यांना पाडळसिंगी परिसरात ती गाडी दिसली. महामार्ग पोलीसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन ती गाडी पेंडगाव परिसरात पकडली. यावेळी गाडीतील तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. तर गाडीसह एकास महामार्ग पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.       संतोष मंत्रे (वय 36 रा. जहाँगिर मोहा ता.धारुर) असे अपहरण केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे कोल्हापूर येथील काही तरुणांनी अपहरण करुन घेऊन जात होते. याची माहिती महामार्ग पोलीसांना मिळाली. त्यांनी रस्त्यावरुन जाणार्‍या गाड्यांवर लक्ष ठेवले. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीच्या वर्णनाची गाडी दिसली. तिचा पाठलाग केला मात्र गाडी थांबवली जात नव्हती. सिनेस्टाईलने पाठलाग करुन ही तवेरा गाडी (एमएच-10 बीए-7677) पेंडगाव परिसरात पकडली. यावेळी गाडीतील तिघांनी धुम ठोकली. तर रोहित राजाराम सकट (रा. करवीर जि.कोल्हापूर) यास पोलीसांनी ताब्यात घेतले. संतोष मंत्रे यांची सुटका केली. सदरील आरोपी व गाडी माजलगाव शहर पोलीसांच्या स्वाधीन केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. महामार्ग पोलीसांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही कारवाई महामार्ग पोलीस सपोनि.प्रविणकुमार बांगर, कल्याण तांदळे, पोना.विकास साळंकुे, सागर शेळके, संदिप बांगर, राख, भोकरे यांनी केली.