क्राईम

वैद्यनाथ बँकेचे चेअरमन दहा लाखाची लाच घेताना पकडले

By Keshav Kadam

October 19, 2020

परळी  : येथील माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय तथा द वैद्यनाथ अर्बन बँकेचे चेअरमन अशोक जैन यास दहा लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.19) दुपारी केली. अशोक पन्नालाल जैन (वय- 52, व्यवसाय – व्यापार तथा चेअरमन, द वैद्यनाथ अर्बन बँक) असे लाच स्विकारणार्‍या आरोपीचे नाव आहे. जैन याने तक्रारदारास सी सी अकाउंटचे अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून 15 लाखाची मागणी केली. त्यानंतर तडजोडकरुन दहा लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, सापळा अधिकारी पोनि.गणेश धोक्रट, पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, पोशि. विलास चव्हाण, चागंदेव बागुल यांनी केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.