क्राईम

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By Keshav Kadam

October 29, 2020

  बीड :  येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील क्रमांक-2 चे शाखा अभियंता यांना 25 हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.29) दुपारच्या सुमारास बार्शीनाका परिसरात करण्यात आली. वशिष्ठ मसू तावरे (जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 – शाखा अभियंता, बीड) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांचे रस्ता मजबुतीकरण केलेल्या कामाची मोजमापपुस्तीका सही करून बांधकाम विभाग येथे पाठवलेली होती. ती एम.बी. तावरे यांनी ऑगस्ट 2019 मध्ये हस्तगत करुन घरी घेऊन गेल्याने तक्रारदार यांचे बील मंजूर झाले नाही. ती एम.बी. देण्यासाठी मोबदला म्हणून तावरे यांनी 27 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 25 हजार रुपये स्विकारण्याचे ठरले. गुरुवारी बार्शीनाका परिसरामध्ये 25 हजार रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडून स्विकारताना बीड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, अमोल बागलाने, सखाराम घोलप, विजयकुमार बरकडे, चालक अंमलदार संतोष मोरे यांनी केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.