acid halla neknoor

अ‍ॅसिड हल्ला झालेल्या ‘त्या’ पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे

बीडमधील धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला

नेकनूर, दि.15 : पुण्याहून गावाकडे परतत असताना प्रियकराने आपल्या प्रेसयीवर अ‍ॅसिड हल्ला करून तिच्यावर पेट्रोल टाकत जिवंत जाळण्याचा प्रकार ऐन लक्ष्मीपुजनादिवशी पहाटे घडला होता. तब्बल बारा तासानंतर पीडितेच्या विव्हळण्याने आजुबाजुच्या लोकांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज या पीडितेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेने अख्खा महाराष्टं हादरून गेला आहे.

बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात ही घटना घडली. सावित्रा (वय 22) असं पीडित तरूणीचं नाव आहे. ती शेळगावातील अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही दिवाळीनिमित्त पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते. गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी आरोपीने गाडी थांबवली. त्यानंतर या तरूणाने तरुणीवर अ‍ॅसिड टाकले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरूणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. त्यानंतर रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, पीडितेचे 48 टक्के टक्के शरीर भाजले होते. परंतु, उपचारा दरम्यान या पीडित तरूणीचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged