pratap sarnaik

न्यूज ऑफ द डे

शिवसेना आमदाराच्या घरी ‘ईडी’चं पथक

By Karyarambh Team

November 24, 2020

मुंबई- ‘ईडी’ पथकाने आता आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे विदेशात असतानाच त्यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीचं पथक दाखल झालं आहे. एकूण दहा ठिकाणी या पथकाकडून झाडाझडती सुरु आहे. आज प्रताप सरनाईक असले तरी इतर शिवसेना नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे.

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत संतापलेईडीच्या या कारवाईनंतर खा.संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सुरुवात तुम्ही केली पण शेवट आम्ही करु. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याचंसारखं काम करु नये. काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन 25 वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील 25 वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे, आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत नाही. ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्यांच्या 100 लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालतं, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधार्‍यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखं वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रं सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या. प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राजकारणासाठी अशा संस्थांचा वापर- बाळासाहेब थोरातभाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. परंतु भाजपच्या विरोधात भूमिका घेणार्‍यांना त्रास होतो, ईडी सारख्या संस्थांचा वापर राजकारणासाठी केला जातोय हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रीया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल.