आष्टी येथील खळबळजनक घटना
आष्टी- दि.24 : आष्टी तालुक्यातील सुरुडी पंचायत समिती गणाच्या सदस्य आशाबाई गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकर्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.सध्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने शेतकर्यांना रात्रीच्यावेळी पाणी देण्याशिवाय पर्याय उरत नाही. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीज आल्याने नागनाथ गर्जे हे सुरुडीच्या पूर्वेला असणार्या दरा नावाच्या शिवारात आपल्या शेतातील पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास नागनाथ गर्जे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आष्टी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.
बिबट्याचा बंदोबस्त करा- दत्ता काकडेआष्टी तालुक्यात सावरगाव, अंभोरा, बीडसंगवी, टाकळी, सुरुडी आदी परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. महावितरणची वीज रात्रीची असल्याने शेतकर्यात प्रचंड भीती आहे. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केली आहे.