आष्टी

माय-लेकरावर बिबट्याचा हल्ला

By Karyarambh Team

November 28, 2020

आष्टी तालुक्यातील पाचव्या घटनेने खळबळ

बीड : आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे तूर काढत असताना माय-लेकावर बिबट्याने हल्ला चढवला. यात दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

  शिलावती बाबा दिंडे (वय 42) व अभिषेक बाबा दिंडे (वय 12) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेही माय-लेक आष्टीपासून जवळच असलेल्या मंगरूळ शिवारात तुरीचे पीक काढत होते. त्याचवेळी बिबट्याने हल्ला चढवला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केली व जखमींना आष्टीच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ.मोराळे हे उपचार करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी बिबट्याने पंचायत समिती सदस्य पतीचा बळी घेतला. त्यानंतर शिरूर तालुक्यातील महिलेवर हल्ला केला. यात महिला जखमी झाली, त्यानंतर आष्टी तालुक्यात 10 वर्षीय बालकाचा बळी तर वनविभगाच्या कर्मचार्‍यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यापाठोपाठ माय-लेकरावर हल्ल्याची ही पाचवी घटना असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

शेरी गावातही वाघ दिसलाआष्टी-कडा रस्त्यावरील शेरी गावाजवळ वाहनधारकांना दुपारी तीनच्या सुमारास वाघ दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एका महिलेवर हा वाघ हल्ला करणार एवढ्यातच येणारी वाहने आडवी आल्याने वाघाने धुम ठोकली. या परिसरात वाघाची व बिबट्यांची संख्या मोठी असल्याचे स्थानिकांनी सांगितले.