बीड

बिबट्याचा आष्टी तालुक्यात धुमाकूळ! रविवारी पुन्हा एका महिलेवर हल्ला!!

By Karyarambh Team

November 29, 2020

आष्टी- तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केला.

बिबट्याच्या हल्ल्यात महिला अशी जखमी झाली आहे

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अष्टीपासून 11 ते 12 किमी अंतरावर असलेल्या पारगाव बोराडे येथील वस्तीवरील शाळांबाई शहाजी भोसले ही महिला शेतात भाजी आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात शालन बाई यांच्या नरडीला जखम झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या महिलेला आष्टीच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कालच बिबट्याने मंगरूळ शिवारात तुरीच्या पिकाची कापणी करत असलेल्या माय- लेकरावर हल्ला चढवला. यात हे दोघे थोडक्यात बचावले. या हल्ल्यात मुलाच्या हाताला आणि आईच्या कमरेला जखम झाली आहे. यापुर्वी सुर्डी गावचे आष्टी पंचायत समितीचे सदस्य पती गहिनीनाथ गर्जे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी दुपारी कीन्ही येथे स्वराज सुनील भापकर या 10 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.