क्राईम

पत्नीच्या जाचास कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

By Karyarambh Team

December 09, 2020

माजलगाव तालुक्यातील वांगी येथील घटना

दि.८ : पतीसोबत सतत भांडण करून मागील तीन महिन्यापासून माहेरी असलेल्या पत्नीकडे गेल्यानंतर पतीचा मानसिक छळ केल्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माजलगाव तालुक्यातील वांगी येथे ३ डिसेंबर रोजी घडली.

सुभाष वैजीनाथ वाव्हुळे (वय ३५ रा.हेरला. ता. हातकलंगले जि.कोल्हापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. सुभाष व त्याची पत्नी जया उर्फ जयश्री सुभाष वाव्हुळ यांचा तीन महिन्यापुर्वी वाद झाला होता. त्यानंतर जयश्री या घरातील सर्व सामान व मुलांना घेऊन माहेरी माजलगाव तालुक्यातील वांगी येथे आली होती. मुलांना व पत्नीला परत घेऊन जाण्यासाठी सुभाष हा देखील वांगी येथे आला होता. त्यावेळी त्याचा पत्नी व सासरच्या मंडळींनी छळ केला. यादरम्यान सुभाष याला जेवण न देणे, त्याचे कपडे न धुणे अशा प्रकारे छळवणूक केली. त्यानंतर तो परत गावी हेरला येथे गेला. मात्र, मन लागत नसल्यामुळे पुन्हा वांगी येथे आला. त्यानंतर देखील तशीच वागणूक मिळाल्यामुळे या छळास कंटाळून त्याने वांगी शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याच्या खिशात एक चिट्ठी सापडली. त्यामध्ये सर्व घटनाक्रम नोंद करून ठेवला आहे. याप्रकरणी मयताचे भाऊ सचिन वाव्हुुळ यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात जया उर्फ जयश्री वाव्हुळ, सासू लता उत्तम वाघमारे, सागरबाई वाघमारे यांच्यावर दि.७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि.पुरी हे करत आहेत.