क्राईम

राखेची वाहतूक करणार्‍या हायवाच्या धडकेत अंबाजोगाईचे चौघे जागीच ठार

By Karyarambh Team

December 13, 2020

बीड : गंगाखेड (जि.परभणी) येथून पंधरा किमी अंतरावर परळी रोडवर झालेल्या हायवा व ऑटोच्या भीषण अपघातात अंबाजोगाईतील चौघे ठार झाल्याची घटना रविरी सायंकाळच्या सुमारास घडली.

विशाल बागवाले (वय 20), दत्ता भागवत सोळंके (25), आकाश चौधरी (23), ऑटो चालक मुकुंद मस्के (22) (सर्व रा. अंबाजोगाई) अशी अपघातात मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे चौघे सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड-परळी रस्त्याने रिक्षाने (क्रमांक एम.एच. 23 टी.आर. 311) अंबाजोगाईकडे परतत असताना राख घेऊन गंगाखेडकडे येत असलेल्या हायवाने (क्रमांक एम.एच. 22 ए. एन. 5121) जोराची धडक दिली. यात चौघेही जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला असून अडीच-तीन तासानंतर अडकलेले मृतदेह पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मृतदेह गंगाखेड येथील खाजगी रुग्णवाहिकेतून गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. हायवा चालक फरार झाला होता.