pankaja munde

क्राईम

वैद्यनाथ साखर कारखान्यातून 38 लाखांचे साहित्य लंपास

By Keshav Kadam

December 23, 2020

 परळी दि.23 : सुरक्षा रक्षक असतानाही भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून चोरांनी 37 लाख 84 हजार 914 रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. ही घटना तब्बल दोन महिन्यानंतर कारखाना प्रशासनास कळली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी लिपिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.       पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू होऊन एक महिना झाला आहे. या कारखान्यात वेगवेगळ्या प्रकारची गोदामे आहेत. स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून संगणक संच, मॉनिटर, 200 किलो कॉपर मटेरियल, 400 किलो मिल बोअरिंग, ब्रास इम्पीरियल, बुश राउंड बार असे 37 लाख 84 हजार 914 रुपयांचे साहित्य 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत चोरांनी लांबवले. गोदामामधील सामानाच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असतानाही चोरीची घटना कशी घडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी लिपिक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

चार संशयित ताब्यातया प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसांनी तपासाला गती दिली असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल. असे ग्रामीण पोलीसांनी सांगितले.