क्राईम

शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा आढळला मृत्यूदेह

By Keshav Kadam

February 03, 2021

खून असल्याचा नातेवाईकांचा आरोप नेकनूर दि.3 : शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.3) सकाळी नेकनूर जवळील रत्नागिरी ( ता.बीड ) येथे घडली . शाळेच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या गळ्यावर असलेल्या जखमा पाहता हा खूनाचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनीही घातपाताचा आरोप केला असुन पोलिस पुढील तपास करत आहेत . दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला आहे .

नेकनुरपासुन जवळच असलेल्या रत्नागिरी येथील धनराज मोतीराम सपकाळ ( वय ६ ) हा आज सकाळी नेहमीप्रमाणे बहिणीसोबत गावातीलच शाळेत खेळण्यासाठी गेला होता . ११.३० वाजण्याच्या सुमारास सर्व विद्यार्थी शाळेच्या परिसरात खेळत होते . अचानक धनराज सपकाळ दिसेनासा झाला . यावेळी त्याचा शोध घेतला असता शाळेच्या आवारातच तो मृत अवस्थेत आढळुन आला . त्याला तात्काळ नेकनुरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी डॉ.घुले यांनी तपासुन त्याला मयत घोषीत केले . धनराजचा मृत्यू गळा दाबुन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार धनराजच्या गळ्याभोवती हाताने आवळल्याच्या खूणा आहेत. यावरून त्याचा खून झाल्याचा आरोप कुटुंब आणि नातेवाईकांनी केला आहे . घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले . दरम्यान या घटनेने नेकनुर आणि परिसरात खळबळ उडाली आहे .