क्राईम

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

By Shubham Khade

February 14, 2021

पूजाच्या वडिलांचा मोठा खुलासा

बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. परंतू सात दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही. या प्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. तो आवाज पुजाचा नाहीच, असे तिचे वडील लहूदास चव्हाण यांनी म्हटले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पूजा चव्हाण शिक्षणासाठी पुण्यात होती, परंतू तिच्या नावे आम्ही कर्ज काढून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामुळे घरचा बहुतांश व्यवहार पुजाच पहात होती. त्यात तिला आजारही होता. कोरोना, बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत असल्याने ती अस्वस्थ असायची, तसं ती बोलून दाखवत असे. ती चिंताग्रस्त होती. तिला चक्कर आली अन् ती इमारतीवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. क्लिप व्हायरल होत आहेत, प्रत्येकजण वेगवेगळे तर्क लावत आहे, क्लिपमध्ये तिचा आवाज नाही, आमची मुलगी येणार नाही, तिची व आमची बदनामी करून वेदना देऊ नका असे तिचे लहूदास चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, आमचा कोणावरही आक्षेप नसल्याचा जबाब पुजाच्या आई व वडिलांनी दिला आहे. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात कोणावरही अद्याप ठोस आक्षेप घेण्यात आलेला आहे. कथीत मंत्री जबाबदार असल्याच्या चर्चा आहेत, परंतू अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे की नाही? याबाबतची माहिती देण्यास नकार दिला जात आहे.