dhananjay munde

न्यूज ऑफ द डे

धनंजय मुंडेंनी सांगितली राजा अन् प्रधानाची गोष्ट

By Karyarambh Team

February 20, 2021

परळी- मागील महिन्यात वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी एका जाहीर कार्यक्रमात आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल बोलून दाखवले. जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे म्हणत त्यांनी यावेळी राजा आणि प्रधानाची गोष्टी सांगितली. त्यांच्या या गोष्टीला उपस्थितांनी हसून दाद देत टाळ्यांचा कडकडाटही केला.गोष्ट सांगताना धनंजय मुंडे म्हणतात ‘मला माझ्या आजीनं ही गोष्ट सांगितली होती. देव करतो ते भल्यासाठीच करतो. एक राजा असतो. दरबारात बसून तलवार पुसत असतो. राजाचा अंगठा तुटतो. ते बघताच प्रधान म्हणतात, राजे, देव करतो ते भल्यासाठी. राजाला राग आला. राजा प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा ठोठावतो. त्यानंतर राजा शिकारीला निघतो. सोबत फौज होती. दाट जंगलात फौज मागे पडून राजा एकटाच पुढए गेला तेव्हा तिथल्या आदिमानवाने त्याला पकडलं. नरबळीसाठी राजाला नेण्यात आलं. पण एका वृद्धाला राजाला अंगठा नसल्याचं लक्षात आलं आणि तो म्हणाला की याला अंगठा नाही, त्यामुळे हा नरबळी चालणार नाही. राजाला सोडून देण्यात आलं. राजानं परत येऊन प्रधानाची सुटका केली. प्रधान राजाला म्हणतो, जे होतं ते भल्यासाठी होतं. जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं, तर तुमच्यासोबत मी असताना आदिमानवांनी माझा बळी दिला असता! म्हणून सांगतो संजय भाऊ (आमदार संजय दौंड), जे होतं, ते भल्यासाठी होतं.’