CHAKU-HALLA

दुचाकीचा कट मारल्यावरुन युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव शहरातील महात्मा फुले शाळेजवळील घटना

माजलगाव : दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरून युवकात झालेल्या बाचाबाचीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील महात्मा फुले शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत ज्ञानोबा धायजे व त्याचा मित्र विश्वानंद राजेश साळवे हे आपल्या दुचाकीवरून अशोक नगरकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अक्षय उर्फ देवा कसबे व विकास आठवे (रा.अशोक नगर) यांनी त्यांच्या गाडीचा कट मारला. यावेळी सिद्धांत धायजे याने आमच्या गाडीला कट का मारला म्हणून अक्षय कसबे याला विचारले. यावेळी अक्षय याने सिद्धांतला थेट शिवीगाळ करत हातातील कुठल्यातरी धारदार शस्त्राने उजव्या हातातील अंगठ्या जवळील बोटावर मारून जखमी केले. तसेच हाताच्या पोटरीवरही वार केला. दरम्यान सोबत असणारा विश्वनाथ साळवे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना त्यालाही विकास आठवे याने हातात दगड घेऊन त्याच्या पाठीवर व हातावर वार करीत जखमी केले. आमच्या नादाला लागला तर तुम्हाला मला जीवे मारून टाकू, अशी धमकी अक्षय व विकास याने दिली. दरम्यान सिद्धांत धायजे याच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय उर्फ देवा कसबे व विकास आठवे विरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 324, 323, 504, 506 (34) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भास्कर राऊत हे करत आहेत.

Tagged