स्टीलचे दुकान फोडले; चार लाखांचा माल लंपास

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.9 : शहरातील बार्शी रोडवर असलेल्या एका स्टील दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील पितळी भांडे लंपास केली आहेत. या भाड्यांची किंमत अंदाजे चार लाखापर्यंत होती. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर रंगनाथ जवकर यांचे बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर साई स्टील स्क्रॅप नावाचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या दुकानात पितळी भांड्याची मोड मोठ्या प्रमाणात होती. जवळपास 8 ते 9 पोत्यामध्ये पितळी मोड ठेवण्यात आली होती. ही सर्व पितळी मोड चोरट्याने लंपास केली. मोड नेण्यासाठी एखाद्या चार चाकी वाहनांचा उपयोग केला असावा. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी जवकर हे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पठाण, तुषार गायकवाड, शेख मोहसीन यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tagged