सोलापूर, दि. 9 : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी शेतकरी नेत्या पूजा मोरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेची स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे चौकशी करून तपशीलवार अहवाल देण्याचे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने जालना पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीआधी महाजनादेश यात्रा काढली होती. तेव्हा राजूर-जालना रोडवरून फडणवीस यांचा ताफा जात असताना ‘मुख्यमंत्री गो बॅक’च्या घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा नेत्या पूजा मोरे यांनी फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. यावेळी साध्या वेशातील जालना पोलिसांनी पूजा यांना अटक केली होती व फक्त पुरुष पोलीस असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये पूजा मोरे यांना बसवले होते. पोलीस व्हॅनमध्ये बसल्यानंतर तिथून पूजा मोरे या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत असताना पुन्हा एका पुरुष पोलिसाने पूजा मोरे यांचे नाक व तोंड दाबले होते. सदर घटनेतून जालना पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली पूजा मोरे हिचा एक प्रकारे विनयभंग केला तसेच एका मुलीला पुरूष पोलिसांकरवी अटक करून, तिच्यासोबत गैरवर्तन केले. या घटनेत जालना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आणि आदेशाचा भंग केला असा आरोप करत सोलापुरातील राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.
या प्रकरणाची सुनावणी मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष तथा सदस्य एम. ए. सईद यांच्यासमोर पार पडली. त्यावेळी तक्रारदार योगेश पवार यांनी पोस्टाद्वारे दाखल केलेले व्हिडिओ पुरावे, कागदपत्रे व लेखी म्हणणे याचा विचार करून एम. ए. सईद यांनी जालना पोलीस अधीक्षक यांना स्वतंत्र, निःपक्षपाती चौकशी करून तपशीलवार अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.