क्राईम

वैद्यनाथ साखर कारखान्यात राडा!

By Karyarambh Team

March 10, 2021

कार्यकारी संचालकाच्या अंगरक्षकास मारहाण परळी दि.10 : माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये पागरीच्या कारणावरुन कर्मचार्‍यांनी राडा केला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या अंगरक्षकास मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चंद्रमणी तरकसे आणि रवींद्र वैद्य असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे. ते परळी शहरातील राहवाशी असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्मचार्‍यांकडून वैद्यनाथ कारखान्यात धुडगूस घातल्याचा संचालक मंडळाकडून आरोप देखील करण्यात आला आहे. या वादावरून राष्ट्रवादीच्या कर्मचार्‍यांमार्फत कारखाना बंद करत कर्मचार्‍यांना बेदम मारहाण व कारखान्यात दगडफेक केली असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच जोर धरत आहेत. कारखाना सुरळीत चालू झाला हे काही जणांना सहन झाले नाही, म्हणून गोंधळ घालण्याचा डाव असल्याचा आरोप वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे, व्यंकटराव कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी केला आहे. कारखान्याचा गाळप हंगाम चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे काही जणांना देखवत नाही म्हणून बदनाम करण्याच षडयंत्र असल्याचे ते म्हणले.