DEVENDRA FADANVIS

शरद पवार, महाविकास आघाडीचा पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या आरोपाबांबत भाष्य केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यूत्तर देत महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र डागले आहे. तसेच, शरद पवार, महाविकास आघाडीकडून पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

फडणवीस म्हणाले, सचिन वाझेच्या अटकेनंतर विविध प्रकारचे खुलासे होत आहेत. कालच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अशा प्रकारचा खुलासा करणारे परमबीर सिंह हे पहिले अधिकारी नसून यापूर्वीही तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी देखील असाच एक अहवाल सादर करून पोलिसांच्या बदल्यांमधील रॅकेट त्यांनी उघड केले होते. पैशांचे मॅसेज, पुरावे दिले होते. तो अहवाल चौकशीअंती मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे गेला. त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जैस्वाल यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकार्‍याने महाराष्ट्रातील महासंचालक हे मानाचे पद सोडले. आणि ते केंद्रात सेवा बजावण्यासाठी गेले. परमबीर सिंह यांची बदली आहे म्हणून त्यांनी आरोप केल्याचे खा.शरद पवार म्हणाले. परंतू जैस्वाल, रश्मी शुक्ला हे सोडून गेलेले अधिकारी आहेत. त्यांच्या आरोपांची साधी चौकशीही नाही. माजी पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या मार्फत आयुक्तांच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी पवारांनी केली. रिबेरो यांचा अनुभव, वय पाहता त्यांचा आदर आहेच, परंतू पदावरील असलेल्या गृहमंत्र्यांची सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी कशी चौकशी करणार? या सरकारला वाचविण्याकरीता पत्रकार परिषद घेतली. सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न पवार यांनी केला. परमबीर सिंग यांनी दिलेल्या पत्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पवार यांना सांगितल्याचा उल्लेख आहे. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. तसेच, पत्रासोबत चॅटचे पुरावे दिले आहेत. ते कसे काय नाकारू शकता? त्यांची बदलीपूर्वीचा पुरावा असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न आहे. गृहमंत्री पदावर आहेत, तोपर्यंत चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा. गृह खाते कोण चालवते? देशमुख की अनिल परब हे समजत नाही? सभागृहातही परब हे गृह खातीबद्दल उत्तरे देत होते. असाही शिवसेनेचा हस्तक्षेप गृहखात्यात असल्याचे राष्ट्रवादीला वाटते, असेही मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

Tagged