varsha gaikwad

न्यूज ऑफ द डे

पहिली ते आठवीच्या परिक्षाच रद्द

By Karyarambh Team

April 03, 2021

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

बीड, दि. 3 : कोरोनाचा वाढता उद्रेक आणि त्यात मुलांना होत असलेला संसर्ग लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा केली. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्या परिक्षाच घेतल्या जाणार नाहीत असा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत वर्षा गायकवाड म्हणतात, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आज मी आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मला सांगायला पाहिजे की मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं. खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो, की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावं आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. तसेच, आता करोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरंतर या मुलांचं वर्षभराचं मुल्यमापन बघितलं पाहिजे, परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा हे होणं शक्य नाही. म्हणून आज आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे. असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.