कोरोना अपडेट

केंद्रीय पथक बीडमध्ये दाखल; कोरोना स्थितीचा घेणार आढावा

By Shubham Khade

April 08, 2021

जिल्हा रूग्णालयाची केली पाहणी

बीड : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (दि.8) सकाळी 10 वाजता केंद्रीय पथक बीडमध्ये दाखल झाले. शहरात येताच पथकाने जिल्हा रूग्णालयास भेट देऊन तब्बल दोन तास पाहणी केली.

  यावेळी पथक प्रमुख डॉ.रक्षा कुंडल, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गीते यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पथकातील डॉ.रक्षा कुंडल, डॉ.अरविंद सिंग कुशवाहा यांनी जिल्हा रूग्णालयात तब्बल दोन तास पाहणी केली. यावेळी रूग्णांशी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. हे पथक कोरोना उपाययोजनासंबंधी आढावा घेत असून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु होती. पुढील चार दिवस हे पथक बीडमध्ये ठाण मांडून असणार आहे. कोराना परिस्थितीचा आढावा घेताना रूग्ण संख्या, मृत्यू संख्या, लसीकरण परिस्थितीची माहिती घेऊन केंद्र शासनाला सादर करणार आहे. पथक जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरु झाली होती.