बीड

माजलगावात खाद्य तेलाच्या गोडाऊनला भीषण आग

By Keshav Kadam

April 15, 2021

फुले पिंपळगाव : माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे असलेल्या नवीन मोंढ्यातील संतोष मुळचंद अब्बड यांच्या महावीर ट्रेडिंग व रॉयल केअर या खाद्यतेल असलेल्या गोडाऊनला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे खाद्यतेलाचे नुकसान झाले आहे.आग लागल्याचे वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अब्बड यांना घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटना स्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या होत्या.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणीच नाही

हे गोडाऊन माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे. या ठिकाणी आशा काही घटना घडल्यास त्यासाठी पाण्याचा मोठा हौद आहे. मात्र तो रिकामाच असल्याने अग्निशमन दलाच्या गड्यांना वेळेवर पाणीच उपलब्ध झाले नाही. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर भलंमोठं माजलगाव धरण देखील आहे. मात्र पाणी भरण्यासाठी गाड्यांचा लांबचा वळसा घालावा लागत होता.

शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्रथमदर्शनी संशय व्यक्त करण्यात येत आहे. खाद्य तेलाच्या किमती प्रचंड वाढल्याने नुकसानीचा आकडा देखील मोठा असू शकतो.