केज

सख्ख्या भावाने केला बहिणीचा खून; कारण अस्पष्ट

By Karyarambh Team

April 21, 2021

केज तालुक्यातील बोरगाव येथील घटना

केज : गुढीपाडव्यानिमित्त आईला भेटण्यासाठी आलेल्या बहिणीचा भावानेच मित्राच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे.

  शितल लक्ष्मण चौधरी (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आईला भेटण्यासाठी पुणे येथून बोरगावला त्यांच्या मुलीसमवेत आल्या होत्या. अज्ञात कारणावरून तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनू गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर (दोन्ही रा.बोरगाव) यांनी डोक्यात हत्याराने वार करून तिचा खून केला. याप्रकरणी मयताच्या चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून येथील ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत. दरम्यान भावाने बहिणीचा खून का केला हे मात्र तपासात निष्पन्न होईल अशी माहिती त्रिभुवन यांनी दिली.