नाशिक येथील खळबळजनक घटना
नाशिक : राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळतीमुळेoxygen tank lick तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.21) घडली. मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माध्यमांना दिली आहे.
ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 केएल क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टँकर आला होता. त्यात काही टेक्निशियन्स होते. तो टँकर रिफिल करण्यात आला होता, असं आयुक्तांनी सांगितलं, मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळं ही घटना घडली, असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितलं. दरम्यान, रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणार्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.