remdesivir

कोरोना अपडेट

या कंपनीच्या रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश

By Karyarambh Team

April 30, 2021

मुंबई, दि.30 ः आधीच रेमडेसिवीरचा राज्यभरात तुटवडा आहे. त्यात आता एक गंभीर प्रकरण सुरु आहे. रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे 90 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे या कंपनीतून तयार झालेली कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल 21013 बॅचचा एक बॅचचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत राज्यसरकारला कळविण्यात आले असल्याचे त्यांनी कळवले आहे. आधीच रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत होता. आता दुषित रेमडेसिवीरचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही रुग्णांना हेटेरो हेल्थकेअर कंपनीची कोविफोर नामक इंजेक्शन दिल्यानंतर त्रास झाल्याची बाब समोर आली. अशाच प्रकारच्या तक्रारी रायगडसह पालघर व पुण्यात देखील आल्याने खळबळ उडाली आहे. या कंपनीचे 500 इंजेक्शन रायगड जिल्ह्याला प्राप्त झाले होते. यापैकी 120 रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आले होते. यातील 90 जणांना इंजेक्शन घेतल्यावर त्रास जाणवला. रुग्णांवरील प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हेटेरो हेल्थकेअर कंपनीने कोविफोर नावाच्या बँच नंबर एचसीएल 21013 इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याची विनंती केली. याबाबत कंपनीच्या वतीने एक पत्र गुरुवारी जारी करण्यात आले. तांत्रिक कारणामुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा असे यात नमूद करण्यात आले. यानंतर पेण येथील सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन गी.दी. हूकरे यांनी या बॅचमधील सर्व कोविफोर इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना आणि वितरकांना दिले आहेत.