मिळमिळ लॉकडाऊन नकोच; निर्बंध कडक करा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश

बीड : जिल्ह्यात आणि विशेष करून बीड शहरात बाहेरून शटर बंद व आतून मात्र सगळं सुरू, अशी परिस्थिती आहे, असले मिळ मिळ लॉकडाऊन काही कामाचे नाही, पोलीस अधीक्षकांनी स्वतः यात जातीने लक्ष घालून लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी. लॉकडाऊनच्या काळात साखळी तोडायची असेल तर निर्बंधांचे काटेकोर पालन झालेच पाहीजे; असे सक्तीचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा यांना दिले आहेत.
   येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुंडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.1) मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ साधेपणाने पार पडला. यावेळी धनंजय मुंडे यांनी अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना वंदन केले तसेच जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनतर बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा व व्यापक लसीकरण मोहिमेच्या धोरणसंदर्भात आयोजित बैठकीत मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले.
  जिल्ह्यात सध्या ऍक्टिव्ह असलेले रुग्ण, उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा यासह अन्य सर्वच बाबींचा श्री. मुंडे यांनी समग्र आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. या बैठकीस आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा मिसकर, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांसह सर्व विभागातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात व अन्य रुग्णालयात नातेवाईकांची वाढती गर्दी हीसुद्धा वाढत्या संसर्गास खतपाणी घालणारी ठरत आहे, यासाठी अतिआवश्यक असलेल्या रुग्णांच्या फक्त एका नातेवाईकास तेही पास देऊनच भेटण्याची मुभा द्यावी, आवश्यक असल्यास आणखी पोलीस सुरक्षा वाढावा अशा सूचना यावेळी मुंडेंनी केल्या. रेमडीसीविर इंजेक्शन वाटप, ऑक्सिजनचा अपव्यय टाळून योग्य गरजूंना पुरवठा होणे यासाठी नेमलेल्या अधिकार्‍यांवर जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी विशेष लक्ष देऊन या बाबी सुरळीत कराव्यात असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.

व्यापक लसीकरण मोहिमेचे नियोजन,
27 के एल ऑक्सिजन पुरवठा होणार
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना आवश्यक असणारा एकूण ऑक्सिजन 24 के एल इतका आहे, धनंजय मुंडे यांनी बैठकीतून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नेमलेले औषध प्रशासन अधिकारी एस.पी.सिंह यांना फोन वरून याबाबत सूचित केले असून, दि.3 मे पासून जिल्ह्याला 27 के एल इतका ऑक्सिजन पुरवठा नियमित करण्यात येईल याबाबतची ग्वाही श्री. एस पी सिंह यांनी दिली आहे. तर जिल्ह्यात 11 ऑक्सिजन प्लांट नियोजनच्या माध्यमातून उभारण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून, प्लांट निर्मितीचे कार्यारंभ आदेश आज जारी होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांनी दिली.

परळीच्या ऑक्सिजन प्लांटचा खर्च नाथ
प्रतिष्ठान करणार-पालकमंत्री धनंजय मुंडे
या 11 पैकी परळी येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन प्लांटसाठी लागणारा सर्व खर्च धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मंजूर रक्कम अन्य सुविधांसाठी वापरावी अशा सूचना मुंडेंनी दिल्या.

18 ते 44 व्यापक लसीकरण मोहीम
जिल्ह्यासह राज्यभरात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यास सुरुवात होत आहे. ऑनलाईन नोंदणी द्वारे उपलब्ध लसींच्या प्रमाणातच नागरिकांना लसीकरण करण्यासाठी वेळ द्यावा. कोणत्याही केंद्रांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबतचे धोरण निश्चित करून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी एक वरिष्ठ अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालय, स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई, ग्रामीण रुग्णालय गेवराई, ग्रामीण रुग्णालय आष्टी आणि ग्रामीण रुग्णालय परळी या पाच ठिकाणी आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यास उपलब्धी नुसार सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी यावेळी दिली.

विद्युत दाहिनी, रुग्णवाहिका तातडीने द्या; त्या घटनेची चौकशी करा
बीड व अंबाजोगाई येथे मंजूर असलेली विद्युत दाहिनी, स्वाराती रुग्णालयास मंजूर असलेली रुग्णवाहिका खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी असे निर्देश यावेळी धनंजय मुंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांना दिले. अंबाजोगाई येथील 22 मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून वाहून नेण्याच्या धक्कादायक प्रकारची तातडीने चौकशी करून या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी असे निर्देश यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले. स्वाराती रुग्णालयात सर्व सुविधांसह नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी मनीषा मिसकर व झाडगे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याचे मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.

Tagged