fire

दारु पिऊन त्रास देणार्‍या बापावर पोटच्या मुलाने झाडल्या तीन गोळ्या

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

जखमीवर उपचार सुरु, आष्टीतील घटना


  आष्टी दि.20 : शहरातील विनायक नगर भागामध्ये जन्मदात्या बापावर पोटाच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.20) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. आष्टी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष किसन लटपटे (वय-50) असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर पोटचा मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (वय-24) याने घरगुती वादातून दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान पोलीसांनी किरण लटपटे यास ताब्यात घेतले आहे. किरनने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्याचे वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन आपल्या आईला मारहाण सुरु केली होती, यानंतर मला राग अनावर झाल्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

तीन महिन्यापूर्वी झाले होते सैन्य दलातून निवृत्त
दरम्यान संतोष लटपटे हे तीन महिन्यापूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. गुरुवारी सायंकाळी या बंदुकीतुनच पोटाच्या मुलाने तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या या त्यांच्या पोटात गेल्या तर एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tagged