आष्टी

राष्ट्रवादीच्या उपसरपंचाकडून आरोग्य कर्मचार्‍यास मारहाण

By Keshav Kadam

May 22, 2021

आष्टी दि.22 : कोविड रुग्णालयात सात ते आठ जणांना एकत्रित जाण्यास विरोध केल्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यास राष्ट्रवादीच्या उपसरपंचाने बेदम मारहाण केली. हा प्रकार आष्टी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. आरोग्य कर्मचारी आक्रमक होताच आरोपींनी रुग्णालयातून पळ काढला. येथील कर्मचार्‍यांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेतला होता. रविंद्र माने हे आष्टी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी आरोग्य सेवक पदावर गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे. शनिवारी (दि.22) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माने हे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर होते. यावेळी चिंचाळा येथील राष्ट्रवादीचे उपसरपंच अशोक पोकळे व अन्य सहा ते सात जणांनी कोविड सेंटरमध्ये बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माने यांनी एक दोन जा एवढे जण जाऊ नका असे सांगितले. ‘तू कोण रे.. तू काय आमचा बाप आहेस का? तू शिपाई आहेस म्हणत रवि माने यास मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहानीचे रुपांतर मोठ्या वादात झाले. रुग्णालयातील सर्व कर्मचारी बाहेर आल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. रवि माने यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.