MURDER

आईला शिवीगाळ, मुलाने कोयत्याने तोडला बाप!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.25 : दारु पिऊन आईला शिवीगाळ करणार्‍या बापाची कोयत्याने सपासप वार करत मुलाने खून केला. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेतात मंगळवारी (दि.25) सकाळी घडली. पोलीसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्रीकिसन अंबादास तागड (वय 60 रा.पिंपळनेर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. श्रीकिसन हे दारु पिऊन सतत घरी वाद घालायचे. घरी शिवीगाळ करायचे. या रागातून मुलगा लहू श्रीकिसन तागड याने शेतात एकटे असल्याचा फायदा घेत कोयत्याने सपासप वार करत खून केला. मुलानेच बापाचा खून केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि.शरद भुतेकर, फौजदार सानप, सुरवसे, वायकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आरोपी मुलास पोलीसांनी ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात मयताचे भाऊ रोहिदास अंबादास तागड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

Tagged