केज

युसुफवडगाव ठाणे हद्दीत साडेसहा लाखांची देशी दारू जप्त

By Shubham Khade

May 26, 2021

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

केज : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत गोपनीय माहितीआधारे बुधवारी मध्यरात्री धाड टाकली. त्या ठिकाणाहून व पुढील तपासात एकूण 6 लाख 42 हजार 120 रुपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व दारू दुकाने बंद आहेत. अशावेळी मद्याची अवैधरित्या विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 26 मे रोजी मध्यरात्री 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील एका घरात छापा टाकला, त्या ठिकाणावरुन देशी दारुच्या 197 पेट्या व बिअरच्या 3 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी गणेश बाबासाहेब रांजणकर याला अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या राहत्या घरातून देशी दारू टॅंगो पंच या ब्रॅंडच्या 90 मिली क्षमतेचे 167 बॉक्स, देशी दारू जी.एम.सफेद डॉक्टर 90 मिली क्षमतेचे 30 बॉक्स व किंगफिशर बीअरचे 3 बॉक्स असा दारुचा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूची किंमत रुपये 5 लाख 97 हजार 120 इतकी आहे. आरोपीने सदर दारु लातूर येथून उस्मानाबाद येथील देशी दारु दुकानाच्या नावाने खरेदी करण्यात आली असून लॉकडाऊन कालावधीत चढ्या दराने दारुची विक्री करुन नफा कमावण्याच्या उद्देश्याने साठवणूक केला होता. सदर गुन्ह्यातील पुढील तपासात सुकळी, ता.केज येथील आरोपीच्या शेतातील धाब्यावरुन देशी दारू टॅंगो पंच ब्रॅंडच्या 90 मिली क्षमतेचे रु. 45 हजार किंमतीचे एकूण 15 बॉक्स अजून रिकव्हर करण्यात आले. याबाबत पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक कडवे, दुय्यम निरीक्षक राठोड, जवान मोरे, सांगुडे, अमीन सय्यद व जारवाल यांनी केली.