अंबाजोगाई

होळच्या शेतकऱ्यासाठी अंबाजोगाईच्या डॉक्टरचा ‛लाख’मोलाचा मदतीचा हात

By Shubham Khade

May 27, 2021

डॉ.नितीन पोतदार यांच्याकडून एक लाखांची मदत

केज : तालुक्यातील होळ येथील अल्प भूधारक शेतकरी चंद्रकांत शिंदे हे म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. पैशाअभावी त्यांचे उपचार थांबले असल्याचे वृत्त ‘कार्यारंभ’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर होळच्या ग्रामस्थांसह अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. आज (दि.२७) अंबाजोगाई येथील डॉ.नितीन पोतदार यांनी एक लाख रुपयांची मदत केली. त्यांच्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

चंद्रकांत शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. आतापर्यंत कुटुंबियांनी उपचारावर साडेचार लाखांचा खर्च केला. तरी देखील उपचारासाठी आणखी जास्त खर्च अपेक्षित आहे. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई येथील ‘आधार डायग्नोस्टिक’चे संचालक डॉ. नितीन पोतदार यांनी सामाजिक भावनेतून या रुग्णाच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. सदर रकमेचा धनादेश चंद्रकांत यांच्या पत्नी उमा शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी होळचे संभाजी लोमटे, दत्ता घुगे आदी उपस्थित होते.