datta devsthan ambajogai

बीड

हेराफेरी : अंबाजोगाईत दत्तात्रय थोरले देवस्थानची 43 एकर जमीनही ढापली

By Karyarambh Team

June 04, 2021

बीड : भुमाफियांनी देवस्थानच्या जमीनीवर दरोडे टाकण्याचा नविन प्रकार अंबाजोगाईत देखील उघडकीस आला आहे. अंबाजोगाई येथील दत्तात्रय थोरले देवस्थानची 43 एकर जमीन भुमाफियांनी स्वतःच्या नावे करून घेतली आहे. हे आदेश तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भू सुधार)चे नरहरी शेळके यांनीच काढले आहेत.अंबाजोगाई शहरातील सर्वे नं. 307, 320, आणि 322 मध्ये अनुक्रमे 6 हेक्टर 31 आर, 4 हेक्टर 45 आर, 7 हेक्टर 01 आर दत्तात्रय देवस्थानची जमीन उपजिल्हाधिकारी शेळके यांनी मदतमास म्हणून घोषित केली होती. या जमीनीचे वारसदार म्हणून नंदकिशोर लक्ष्मणराव सोमवंशी यांनी जमीनीची प्रतिबंधीत मालकी मिळणेबाबत व कब्जाहक्क घोषित करणेबाबत अपिल दाखल केले होते. त्यासाठी त्यांनी वारसाचा पुरावा म्हणून मंगल विलास गोस्वामी व योगेश विलास गोस्वामी यांचे संमंतीपत्र तसेच 1978-79 चे इनामपत्र तसेच 1954-55 चे खासरा पत्रक व सन 1959-60 ची सातबारा व 1999 ते 2008-09 सातबारा इत्यादी कागदपत्रे जोडली होती. सदरील जमीन दत्तात्रय देवस्थान थोरले देवघर या देवस्थानची मदतमास जमीन असल्याचे सांगितले होते. या देवस्थानला एकूण 1561 एकर जमीन आहे. ती डिघोळ अंबा, लोखंडी सावरगाव, कौडगाव, पैठण, भोकरबा, कळंब, दर्जीबोरगाव, ननज, जामखेड, माकेगाव, केकतसारणी इत्यादी ठिकाणी आहेत. या जमीनीचे मुळ मालक तथा देवस्थानचे सेवेकरी शिवाजी देवाजी गोस्वामी हे इ.सन. 1292 फसलीमध्ये मयत झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचे वारस म्हणून दत्तात्रय यांची पाच मुले डिगांबर, चितांबर, योगीराज, विश्वांभर, व नारायण यांना दाखविले. त्यापैकी दिगंबर गोस्वामी चे वारस म्हणून विलास गोस्वामी आणि विलास यांचे वारस म्हणून मंगलबाई गोस्वामी आणि योगेश गोस्वामी यांनी दाखविण्यात आले. त्यांनी 100 रुपयांच्या बॉन्डवर सोमवंशी यांच्यासाठी संमत्रीपत्र लिहून दिल्याचे कागद दाखविण्यात आले.त्यानुसार उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके यांनी 27 फेब्रुवारी 2018 रोजी ही जमीन मदतमास मध्ये नंदकिशोर लक्ष्मण सोमवंशी यांच्या मालकी हक्कात बहाल केल्याचे आदेशात म्हटले आहे. वास्तविक 43 एकरची मालकी एखाद्याला देत असताना केवळ संमतीपत्रावर दिली जाऊ शकते का? हे आणि असेच प्रकार अन्यही जमीन प्रकरणात करण्यात आले आहेत.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची पालकमंत्र्यांकडे तक्रारअंबाजोगाईच्या दत्तात्रय थोरले देवस्थानच्या जमीनी अनाधिकृत मार्गाने डॉ.नंदकिशोर लक्ष्मणराव सोमवंशी हे बळकावत असल्याची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. डॉ.सोमवंशी यांचा या जमीनीशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही ते देवस्थानचे अर्चक (सेवेकरी) नाहीत, असेही तक्रारीत म्हटले आहे.