budun mrutyu-panyat budun mrutyu

क्राईम

शेततळ्यात बुडून बापलेकासह एकाचा मृत्यू

By Keshav Kadam

June 10, 2021

गेवराई दि.10 : शेततळ्यात बुडून बाप-लेकासह अन्य एका जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे गुरुवारी (दि.10) सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुनिल जग्गनाथ पंडित (वय 40), त्यांचा मुलगा राज पंडित (वय 12) व आदित्य पाटील (वय 10 रा.शेवगाव) असे शेततळ्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

गेवराई येथे सुनील पंडित यांचा चार चाकी वाहन खरेदी विक्रीसह फायनान्सचा व्यवसाय आहे. ते मागील काही वर्षांपासून शहरातच वास्तव्यास आहेत. दरम्यान पंडित हे गुरुवारी दुपारी मुलगा राज व पत्नीचा भाचा आदित्य या दोघांना घेऊन त्यांच्या दैठण येथील शेतात गेले होते. यानंतर ते शेतातील शेततळ्यावर गेले होते. यावेळी राज आणि सुनील यांचा भाचा आदित्य पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले. हे पाहून सुनील पंडित यांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारून मारली. त्यांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शेततळ्याच्या अस्तरीकरणावरुन पाय घसरत असल्याने त्यांना वरती येण्यासाठी सहारा न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर तिघांचेही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने शेततळ्याबाहेर काढून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण दैठणसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.