bibtya halla

क्राईम

नेकनूर परिसरात शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला!

By Keshav Kadam

June 11, 2021

नेकनूर दि.11 : नेकनूरच्या दक्षिणेस असलेल्या आठ किलोमीटरवरील कळसंबर परिसरात उसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. त्यानंतर काही तासातच बिबट्याने एका शेतकर्‍यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. सदरील शेतकरी गंभीररित्या जखमी झाला असून त्यावर नेकनूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी (दि.11) दुपारी कळसंबर येथील गोरख वाघमारे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. बघता बघता या ठिकाणी गावातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांना माहिती मिळाल्याने लागलीच नेकनूर ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे, पोशि.खाडे, खांडेकर, डोंगरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत गर्दी पांगवली.

त्यानंतर उसातील ठसे पाहून वन विभागाला संपर्क केला. वन विभागाचे वनाधिकारी अमोल मुंडे, दिनेश मोरे, अच्युत तोंडे हे शेतात दाखल झाले. त्यांनी तो बिबट्या असल्याचे ओळखले. मात्र हा बिबट्या हुलकावणी देत बाजूच्या जेतळवाडीच्या दिशेने गेला होता. याच वेळी शेतात घरी जात असलेल्या अजिनाथ वाघमारे (वय 40) या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला चढवला. यामध्ये वाघमारे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नेकनूर येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करुन त्यांना बीड जिल्हा रुग्णालयाकडे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे.