road accident

क्राईम

अवजड वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार

By Karyarambh Team

June 23, 2021

एचपीएमच्या निष्क्रियतेचा बळी

नेकनूर, दि 23 : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एचपीएम च्या सिमेंट रोड रोडवरील शून्य नियोजनामुळे अनेक अपघात झाले असतांनाच रात्री नेकनूर जवळील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पुन्हा अपघात झाला असून त्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याने एचपीएम च्या शून्य नियोजनामुळे आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळे बळी गेला असल्याचे या वेळी सांगण्यात आले असून या मुजोर कंपनी विरोधात आता नातेवाईकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

नातेवाईकांना भेटून केजकडे परत निघालेल्या इसमाला नेकनूर जवळ एका अवजड वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनाने पुढच्या चाकाखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . संजय मारुती राऊत ( 43 ) रा.कानडी माळी ता.केज असे मयत इसमाचे नाव आहे . संजय हे चौसाळा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते . परंतु दि .22 राजी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान तिकिटाला पैसे नसल्याने नेकनूरहून गावाकडे परत पायी निघाले होते . मात्र नेकनूर शेजारील पुलाच्या जवळ आले असता त्यांना ( MH 16 AY 5533) या अवजड वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनाने चिरडले . त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला . अपघात झाल्यानंतर त्यांना नेकनूर च्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले असून तिथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे . संजय यांच्या पश्चात , पत्नी , चार मुली , एक मुलगा असा परिवार असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान सदरील वाहनाच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.