suresh dhas morcha

कोरोना अपडेट

मराठा आरक्षणाचा विरोधक असलेला मंत्री विजय वडेट्टीवार बोगस अन् फडतूस अवलाद – आ.सुरेश धस

By Karyarambh Team

June 28, 2021

बीड, दि. 28 : मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार मनाला येईल ते बोलत आहेत आणि हे सरकार त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. इतकी बोगस आणि फडतूस अवलाद या सरकारमध्ये असेल तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल? या वडेट्टीवारांनी आमच्या बीड जिल्ह्यात पाऊल ठेऊन दाखवावे, पोलीस बंदोबस्तात नाही त्यांची आरती केली तर आम्हाला काही म्हणा, असा थेट ईशारा भाजपाचे विधान परिषद सदस्य आ. सुरेश धस यांनी दिला.बीडमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावर आ.सुरेश धस यांनी आज प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चाला प्रचंड असा जनसमुदाय धसांनी जमवला होता. शहरातील आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. माळीवेस, बशीरगंज-छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी गेवराई मतदारसंघाचे आ.लक्ष्मण पवार, माजी आ.आर.टी.देशमुख, माजी जि.प.अध्यक्षा मीराताई गांधले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सीए बी.बी. जाधव यांच्यासह गंगाधर काळकुटे, कंत्राटी कोविड कर्मचारी संघटनेचे संभाजी सुर्वे, स्वाभीमान संघटनेचे प्रा.सचिन उबाळे, ऊसतोड कामगार संघटनेचे सुग्रीव सानप, अभिजीत शेंडगे, गणेश उगले यांची उपस्थिती होती.आ.धस म्हणाले की, कोविड काळात आम्ही लोकांमध्ये राहीलो, लोकांचे जीव वाचवले. घाबरून घरात बसणार्‍यांपैकी आम्ही नाहीत. त्यामुळे 2 दिवसात मोर्चाची तयारी करून एवढे लोक या मोर्चासाठी जमले आहेत. अधिवेशन घ्या म्हटलं तर कोरोना, मोर्चा, आंदोलने करायची म्हटलं तरी कोरोना, अरे असल्या कोरोना फिरोनाला आम्ही घाबरत नाहीत. पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घ्यायला कोरोना नव्हता का? राष्ट्रवादीच्या लोकांना परिसंवाद यात्रा घ्यायला जमते. त्यांचा कुठल्या परिबरोबर संवाद सुरु आहे? आणि आम्ही मोर्चा काढायचा म्हटलं की कोरोना असतो का? असा सवाल आ.धस यांनी केला. बीड जिल्ह्यात कोरोनाने मृत झालेल्या लोकांची आकडेवारी अजुनही दाबून ठेवण्यात आली आहे. बीडचा मृत्यू दर साडेपाच टक्क्यांच्या पुढे आहे. सगळ्या ग्रामसेवकांना सुचना देऊन दोन दिवसात झालेले मृत्यू अपडेट करायला लावा. कोरोना काळात अनेकांचे जीव गेले. साधे रेमडेसीवीर इंजेक्शन लोकांना मिळाले नव्हते. 35-35 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकत घ्यावे लागले, असाही आरोप आ.धस यांनी केला.आरक्षण प्रश्नावर बोलताना धस म्हणाले, साडेतीन टक्क्याच्या माणूस म्हणून लोकांनी देवेंद्र फडणवीसांना हिनावले होते. परंतु याच साडेतीन टक्क्यावाल्या माणसाने मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र या दळभद्री सरकारला हे टिकवता आलेलं नाही. कुणाचा पाहुणा वकील म्हणून द्यायचा होता तर कुणाला न्यायालयात म्हणणं माडायला वेळच मिळत नव्हता. आणि आरक्षण रद्द झाल्यानंतर ही जबाबदारी केंद्रावर ढकलली जात आहे. ह्यांच्या नालायक कारभारामुळे एकट्या मेडिकलच्या मुलांना 20-20 लाख रुपये फिस भरण्याची वेळ आली आहे. राज्यात बंजारा समाजानंतर सर्वाधिक ऊसतोड मजूर म्हणून मराठा समाज आहे. आणि त्यांच्या लेकरांचं शिक्षण आता बंद होतंय की काय अशी भिती आमच्या मनात निर्माण झाली आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी भरलेली सगळी परिक्षा फिस परत मिळावी, आणि आरक्षण मिळेपर्यंत सरकारने आमच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी, असेही आ.धस म्हणाले. उठसूठ काहीपण केंद्रावर ढकलू नका. साधं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण देखील यांना टिकवता आलेलं नाही. हे सरकार निव्वळ धोकेबाजीनं आलेलं सरकार आहे. ह्यांनी सातफेरे आमच्याबरोबर घेतले आणि मंगळसूत्र घालायच्या टायमाला नवरीच दुसर्‍याबरोबर पळून गेली, अशी आमची अवस्था झालेली होती, असा टोलाही आ.धस यांनी लगावला. यावेळी आ.लक्ष्मण पवार, आ.आर.टी.देशमुख व इतरांची देखील भाषणं झाली.मोफत लसीकरणाला लसच नाहीमोठा गाजावाजा करून सरकारने मोफत लस देण्याची घोषणा केली. मात्र केंद्रावर लसचाच पत्ता नाही. ज्यांनी कोविड काळात जिवावर उदार होऊन रुग्णांची सेवा केली त्या लोकांना तुम्ही आता वार्‍यावर सोडू शकत नाही. त्यांची प्राधान्याने नोकर भरती करावी, अशी मागणीही आ.धस यांनी केली.आण्णा तुम्हा आवाज द्या, आम्ही सोबत येऊगेवराईचे आ.लक्ष्मण पवार म्हणाले, आ.सुरेश धस यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर मोर्चा काढण्यासाठी माझ्याकडे चर्चा करायला आले होते. दोन दिवसात नियोजन होईल का? असेही ते म्हणाले, पण त्यांना सांगितले तुम्ही मोर्चा काढा आम्ही सोबत येऊन, आणि दोनच दिवसात आण्णांनी एवढी मोठी गर्दी या मोर्चाला जमवून दाखवली. या सरकारला आरक्षण तर टिकवता आलेच नाही परंतु मराठवाड्याच्या विकासाच्या कुठल्याही योजना यांना पुर्णत्वाला घेऊन जाता आलेल्या नाहीत. वॉटरग्रीड सारखी महत्वकांक्षी योजनाही सरकारला पुढे नेता आलेली नाही, असा आरोपही आ.पवार यांनी केला.मराठा आरक्षणावर जो मोर्चा काढणार त्यांना पाठींबा -बी.बी.जाधवमराठा आरक्षण प्रश्नावर जो कोणी पुढे येऊन मोर्चा काढेल त्या त्या मोर्चाला आमचा पाठींबा असेल याचा पुनरूच्चार मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सीए बी.बी. जाधव यांनी केला.

मोर्चा भाजपाचा पण खा.मुंडे जिल्ह्यात असुनही अनुपस्थितमराठा आरक्षण प्रश्नावर आ.धस यांनी आयोजित केलेला हा मोर्चा भाजपचा अधिकृत मोर्चा असल्याचे आ.धस म्हणाले होते. त्यामुळे व्यासपीठावर भाजपा आ.लक्ष्मण पवार, माजी आ.आर.टी देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. शिवाय भाजपाचे निलंगा येथील संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपला प्रतिनिधी या मोर्चात पाठवलेला होता. मात्र असे असताना भाजप पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित नव्हते. खासदारांनी पाठवलेला प्रतिनिधी देखील या मोर्चात नव्हता. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे बीडमध्ये असूनही या मोर्चाकडे फिरकल्या नाहीत. त्यांनी त्यावेळी धसांचे विरोधक माजी आ.भीमराव धोंडे यांच्या समवेत रेल्वे कामाची पाहणी केली. त्यामुळे खा.मुंडे यांच्या अनुपस्थितीविषयी मोर्चास्थळी उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. शिवाय मोर्चाच्या बॅनरवर देखील खा.मुंडेंना स्थान देण्यात आलेले नव्हते.

धसांनी गर्दी जमवून दाखवलीमोर्चा जिल्ह्याच्या ठिकाणी असला तरी संपूर्ण गर्दी ही आष्टी मतदारसंघातून आलेली होती. ही गर्दी बीडला आणून धसांनी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले आहे. संपूर्ण भाषणात आ.धसांनी देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतूक केलं. अमृता फडणवीस यांच्या विषयी सोशल मीडियातून होणार्‍या टिकेचाही त्यांनी समाचार घेतला. त्यामुळे प्रदेश भाजपाकडून येणार्‍या काळात आ.धसांना आणखी ताकद मिळाली तर आ.धस निश्चितपणे भाजपाचे जिल्ह्याचे नेते होणार यात शंका नाही.